लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विनम्र अभिवादन; सारसबाग व कोथरूड येथे महापुरुषांना वंदन
पुणे : श्रम, संघर्ष आणि सामाजिक समतेचा अमर संदेश आपल्या क्रांतीकारी साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून जनमानसात पोहोचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हा राष्ट्रभक्तीचा महामंत्र देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सारसबाग आणि कोथरूड येथे दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन केले.
पुण्यातील सारसबाग परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापाशी भव्य अभिवादन सोहळा पार पडला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी केंद्रीय सहकार व नागरी विमानचालन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या माजी उपसभापती निलम गोऱ्हे, आमदार हेमंत रासने, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, महापालिका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकमान्य टिळकांनी दिलेला राष्ट्रभक्तीचा आणि स्वराज्याचा विचार, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आणि डफावर थाप मारून दिलेला समाजजागृतीचा संदेश आजही आपल्या समाजमनाला ऊर्जा देत आहे. त्यांच्या विचारांचा पवित्र वारसा जपत सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी अधिक दृढतेने कार्यरत राहणे, हीच या दोन्ही महापुरुषांना आपली खरी आदरांजली ठरेल. या दोन्ही कार्यक्रमांना विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटील यांनी कोथरूड येथील आपल्या निवासस्थानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.