डीईएस पुणे युनिव्हर्सिटीत अत्याधुनिक संशोधन केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते संपन्न ; सोहळ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : पुण्यात डीईएस पुणे युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायन्स अँड मॅथेमॅटिक्सच्या नूतन इमारतीचे तसेच अत्याधुनिक संशोधन केंद्राचे उद्घाटन आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या महत्त्वपूर्ण सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या केंद्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
याबाबत माहिती देताना पाटील यांनी म्हटले, भारताला ज्ञानाधिष्ठित आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणे आवश्यक आहे. याच दृष्टीने पुण्यातील विविध संशोधन संस्था, विद्यापीठे आणि तज्ज्ञांना एकत्र आणणारा सर्वसमावेशक रिसर्च फोरम उभारण्याचा मानस आहे. या माध्यमातून संशोधनाला नवी गती मिळेल आणि युवा संशोधकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असेही पाटील यांनी म्हटले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. रवींद्र आचार्य, ॲड. अशोक पालांडे, डॉ. आनंद काटीकर, डॉ. राजेश इंगळे, डॉ. तुषार देशमुख यांच्यासह नियामक व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.