ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी व इतर शुल्काची माहिती सूचना फलकावर देणे आवश्यक – मंत्री चंद्रकांत पाटील

4

मुंबई : उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्काबाबत संपूर्ण आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, नुकताच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाला असून, सर्व महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरण यांच्या नियमानुसार व मान्यतेनुसार आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क, ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर शुल्क यांची अद्ययावत माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागात सूचना फलकावर लावणे अनिवार्य करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रवेश शुल्काबाबतची संपूर्ण माहिती शुल्कासहित महाविद्यालयाच्या प्रवेश माहितीपुस्तिकेत आवश्यक असलेल्या भागात अनिवार्यरित्या नमूद करण्यात यावी. शुल्काबाबतची माहिती आणि प्रवेश माहितीपुस्तिकेतील शुल्काबाबतची माहिती सर्व प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वी देणे ही संबंधित महाविद्यालयांची जबाबदारी राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शुल्काबाबतची माहिती सूचना फलकावर आणि प्रवेश माहितीपुस्तिकेमध्ये दिसण्याबाबतची खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठ आणि संबंधित विभागीय सहसंचालक यांची राहील.

सर्व विभागीय सहसंचालक आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांनी बाब आपल्या अधिनस्त आणि संलग्नित महाविद्यालयांना आपल्या स्तरावरून तत्काळ सूचित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही, याची दक्षता संबंधित महाविद्यालयांनी घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवल्यास संबंधित महाविद्यालय जबाबदार राहील, असे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.