‘एमएसएफडीए’च्या सुधारित संकेतस्थळाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

4

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने  महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) च्या नवीन सुधारित संकेतस्थळाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे येथे आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक तथा एमएसएफडीए चे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि एमएसएफडीए चे अधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, एमएसएफडीए ही संस्था राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापक आणि शैक्षणिक नेतृत्व यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून, गुणवत्ता वृद्धी, क्षमता विकास आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबवत आहे. राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये आधुनिक अध्यापन पद्धती, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि बहुविद्याशाखीय दृष्टीकोन रुजविण्यासाठी एमएसएफडीए महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

www.msfda.ac.in⁠ या संकेतस्थळाद्वारे एमएसएफडीए च्या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. संबंधितांना स्वतःची प्रोफाइल तयार करून प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी थेट नोंदणी करता येणार असून, कार्यक्रमांचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, सूचना आणि शैक्षणिक संसाधने एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहभागींसाठी प्रमाणपत्र देण्याची सुविधा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे व्यवस्थापन अधिक सुलभ झाले आहे. तसेच विविध संस्थांबरोबर सामंजस्य करार (MoU) करून प्रशिक्षण कार्यक्रमांची गुणवत्ता आणि व्याप्ती वाढविण्यावर एमएसएफडीए भर असणार आहे.

उद्योग, शैक्षणिक संस्था आणि तज्ज्ञ यांच्यात समन्वय साधून अधिक परिणामकारक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विविध सहकार्य उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे संकेतस्थळ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, सतत व्यावसायिक विकास, डिजिटल शिक्षण आणि शैक्षणिक प्रशासन यांना चालना देणारे ठरणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शैक्षणिक सक्षमीकरण आणि संस्थात्मक परिवर्तनासाठी एमएसएफडीए ची भूमिका अधिक बळकट होणार असल्याचा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

यापुढे एमएसएफडीए चे सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नोंदणी www.msfda.ac.in⁠ या संकेतस्थळाद्वारेच करण्यात येणार असून, राज्यातील सर्व संबंधित घटकांनी संकेतस्थळाचा नियमित आणि सक्रिय वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.