डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना ‘MahaSARC’ च्या अध्यक्षपदी मुदतवाढ; शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनाच्या ध्येयाला गती देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राला अधिक सक्षम आणि संशोधनाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या (MahaSARC) अध्यक्षपदी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. कुलकर्णी यांचे अभिनंदन केले असून हा निर्णय राज्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
या निर्णयाचे स्वागत करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्र अधिक सक्षम, संशोधनाभिमुख आणि जागतिक दर्जाचे करण्याच्या दृष्टीने हा निर्णय निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल. राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन आणि आधुनिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमचे राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे.
पक्षाच्या आणि शासनाच्या ध्येयधोरणांचा उल्लेख करत मंत्री पाटील पुढे म्हणाले, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘ज्ञानाधारित भारत’ या दूरगामी संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनाच्या ध्येयाला गती देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. डॉ. कुलकर्णी यांच्या अनुभवाचा फायदा या मोहिमेला अधिक गतिमान करण्यासाठी होईल.
डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे ‘MahaSARC’ च्या माध्यमातून आगामी काळात राज्यातील संशोधन क्षेत्राला नवीन दिशा मिळेल आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण होण्यास मदत होईल, अशी आशा शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.