MSFDAच्या वतीने आयोजित नारीदृष्टी निवासी कार्यक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते (ऑनलाईन) उद्घाटन
मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांच्या क्षमता विकासास चालना देण्यासाठी आणि त्यांच्यातील नेतृत्व गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे यांच्या वतीने ‘नारीदृष्टी’ (Nurturing Visionary Women Leaders for Transformation in Academia) या विशेष पाच दिवसीय निवासी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसचिव संतोष खोरगडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे तसेच विविध क्षेत्रांतील महिला, विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांनी आता केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता संशोधन, प्रशासन, शैक्षणिक धोरण निर्मिती आणि संस्थात्मक नेतृत्व या क्षेत्रांतही सक्रिय पुढाकार घेऊन महिलांनी या क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन करून‘नारीदृष्टी’सारखे उपक्रम महिला प्राध्यापकांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडविण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात नारीशक्तीला केंद्रस्थानी ठेवून विविध धोरणे आणि उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. शिक्षण, विज्ञान, प्रशासन, उद्योग आणि संरक्षण अशा सर्वच क्षेत्रांत महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील माहिती देशासमोर मांडण्यासाठी महिलांनी घेतलेली पत्रकार परिषद ही राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत महिलांच्या सक्षम भूमिकेचे आणि बदलत्या भारतातील त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, “एकाच दिवशी चार महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे उद्घाटन होणे ही MSFDA साठी अभिमानाची बाब आहे. ‘नारीदृष्टी’ महिला नेतृत्वाला नवी दिशा देईल, तर तीन FDP कार्यक्रम प्राध्यापकांना तंत्रज्ञान, अनुभवाधारित अध्यापन आणि परिणामाधारित शिक्षणामध्ये अधिक सक्षम करतील. NEP 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.MSFDA च्या या उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धात्मक बनतील.
या पाच दिवसीय निवासी कार्यक्रमामध्ये राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील महिला प्राध्यापक सहभागी झाल्या आहेत. या कालावधीत महिला प्राध्यापकांसाठी खालील महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांद्वारे विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे:
यावेळी’नारीदृष्टी’ या महिला नेतृत्व विकास कार्यक्रमासह Teaching with Smart Technology FDP, Project-Based Learning FDP आणि CO-PO Integration & Micro Planning for Outcome-Based Accreditation FDP या तीन अध्यापक विकास कार्यक्रमांचे एकाचवेळ उद्घाटन करण्यात आले.
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. सुनील भिरुड तसेच HSNC विद्यापीठ, मुंबईच्या कुलगुरू कर्नल प्रा. हेमलता बागला उपस्थित होते.