मराठी भाषा विद्यापीठाच्या कामकाजाला गती देण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न
मुंबई : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन करण्यात आलेल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात आढावा बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव वाढविणाऱ्या या विद्यापीठाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे पाटील म्हणाले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि आपल्या समृद्ध ज्ञानपरंपरेच्या संवर्धनासाठी हे विद्यापीठ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विद्यापीठाच्या विविध प्रलंबित कामांना गती देऊन त्याचे कामकाज अधिक सक्षमपणे पुढे नेण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
मराठी भाषेच्या संवर्धनासोबतच संशोधन, शिक्षण आणि ज्ञाननिर्मितीचे प्रभावी केंद्र म्हणून रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाची उभारणी करण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही गतिमान करण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव प्रताप लुबाळ, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकर बाबा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.