विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपत, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राचार्यांनी आठवड्यातून किमान एकदा विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा ; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
मुंबई : विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील त्यांच्या दालनात आयोजित विशेष बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून मुंबईतील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपत, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राचार्यांनी आठवड्यातून किमान एकदा विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा, अशा सूचना दिल्या. तसेच हिंदुजा, थाडोमल इंजिनीअरिंग, लाला लजपत राय व सस्मिरा टेक्स्टाईल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.
या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, तसेच संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.