विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर ‘एकल पाल्य’ अशी नोंद करण्यासंदर्भात दोन कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील कौटुंबिक हिंसाचार, घटस्फोट, पतीचे निधन किंवा इतर सामाजिक कारणांमुळे एकटीने पाल्यांचे संगोपन करणाऱ्या एकल मातांच्या पाल्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील पाऊल उचलले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची एक महत्त्वपूर्ण ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या एकल मातांच्या पाल्यांना उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात विविध सवलती, प्रवेशात प्राधान्य आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा सहज उपलब्ध करून देण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली
या विद्यार्थ्यांची अचूक आणि योग्य नोंदणी व्हावी, या उद्देशाने विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर ‘एकल पाल्य’ अशी नोंद करण्यासंदर्भात दोन कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्याचे निर्देश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कौटुंबिक हिंसाचार, घटस्फोट, पतीचे निधन किंवा अन्य सामाजिक कारणांमुळे अनेक महिला एकटीने पाल्यांचे संगोपन करतात. सध्याच्या प्रवेश प्रक्रियेत आई-वडिलांची माहिती भरण्याची आवश्यकता असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद होण्यासाठी प्रवेश अर्ज आणि नोंदणी फॉर्ममध्ये ‘एकल माता’ हा रकाना अनिवार्य करण्यात येणार आहे.
या बैठकीस उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर (ऑनलाइन) यांच्यासह राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू ऑनलाइन उपस्थित होते.