विद्यार्थ्यांना बदलत्या काळाशी सुसंगत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

10

मुंबई : मुंबई येथील डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी-२०२०) अंमलबजावणीसंदर्भातील विचारमंथन व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत धोरणाच्या प्रभावी आणि वेळबद्ध अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा केली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी-२०२०) हे केवळ अभ्यासक्रमातील बदल नसून उच्च शिक्षण व्यवस्थेला अधिक गुणवत्तापूर्ण, संशोधनाभिमुख, कौशल्याधारित, रोजगाराभिमुख आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्याचा व्यापक आराखडा आहे. विद्यार्थ्यांना बदलत्या काळाशी सुसंगत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज आहे, असे पाटील यांनी म्हटले.

यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करत धोरणातील प्रत्येक उद्दिष्ट निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत, असे निर्देश यावेळी मंत्री पाटील यांनी दिले. तसेच विद्यार्थीकेंद्रित, गुणवत्तापूर्ण आणि भविष्योन्मुख उच्च शिक्षण व्यवस्था उभारण्यासाठी सर्व संबंधितांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून कार्य करण्याचे आवाहन देखील केले.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ तथा तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल, सहसचिव संतोष खोरगडे, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.