विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवकांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

11

मुंबई, २६ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईतील होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे विशेष बैठक घेतली. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.

या बैठकीत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि समस्या सविस्तरपणे मांडल्या. सर्व मुद्दे समजून घेत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर निश्चितच सकारात्मक प्रयत्न केले जातील. यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आगामी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल.”

या महत्त्वपूर्ण बैठकीप्रसंगी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, संयुक्त कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.