‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालया’चे काम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करा : मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : मुंबईच्या सांताक्रूझ येथील कलिना कॅम्पसमध्ये उभारण्यात येत असलेल्या ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालया’च्या नवीन इमारतीच्या बांधकामाची राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. या प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेतानाच, बांधकामाचा दर्जा सर्वोत्तम राखून सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश ना. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या प्रकल्पाचे महत्त्व विशद करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “राज्यातील संगीत शिक्षणाला जागतिक ओळख मिळवून देण्यासह विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधांसह उच्च दर्जाचे प्रशिक्षण व संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे महाविद्यालय उभारण्यात येत आहे. हे महाविद्यालय भविष्यात संगीत क्षेत्रातील कलाकारांसाठी एक जागतिक दर्जाचे केंद्र ठरेल, असा मला ठाम विश्वास आहे.”
या पाहणी दौऱ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यासह सार्वजनिक बांधकाम व उच्च शिक्षण विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.