विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच मिळणार व्यावहारिक कौशल्ये; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘ऑन-द-जॉब ट्रेनिंग’ डॅशबोर्डचे लोकार्पण
मुंबई : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करता यावीत, हा नव्या शैक्षणिक धोरणाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. याच दिशेने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या OJT (On-the-Job Training) डॅशबोर्डचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात ऑनलाइन उद्घाटन केले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या डिजिटल प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या ऑन-द-जॉब ट्रेनिंग प्रक्रियेचे नियोजन, समन्वय, देखरेख आणि संनियंत्रण अधिक सुलभ, पारदर्शक व प्रभावी होणार आहे. शिक्षण आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील दुवा अधिक भक्कम करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरेल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षणाला कौशल्याची, अनुभवाची आणि रोजगारक्षमतेची जोड देणाऱ्या अशा डिजिटल उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया अधिक भक्कम होत आहे. हा उपक्रम विकसित करणाऱ्या विद्यापीठाचे मंत्री पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव अमोल मुत्याल, उपसचिव प्रताप लुबाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनोद मोहितकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.