शासनाच्या अधिकारक्षेत्रातील विषयांचा सविस्तर अभ्यास करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विनाअनुदानित महाविद्यालयांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित महाविद्यालय संघाच्या प्रतिनिधींनी कायम विनाअनुदानित महाविद्यालयांसमोरील विविध शैक्षणिक, प्रशासकीय व धोरणात्मक विषयांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित महाविद्यालय संघाने मांडलेल्या विविध मागण्या व सूचनांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. शासनाच्या अधिकारक्षेत्रातील विषयांचा सविस्तर अभ्यास करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव संतोष खोरगडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित महाविद्यालय संघाचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.