विद्यार्थ्यांनी आपली आवड, क्षमता आणि समाजाच्या गरजा ओळखून विधायक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक अडचणी जाणून घेतल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे होणारे फायदे, तसेच त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी पाटील म्हणाले, विद्यार्थीदशा हा व्यक्तिमत्त्व विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात ज्ञान आणि कौशल्यासोबत सामाजिक जाणीव विकसित होणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली आवड, क्षमता आणि समाजाच्या गरजा ओळखून विधायक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुलींना उच्च शिक्षण घेताना आर्थिक पाठबळ आणि आत्मविश्वास मिळावा, यासाठी विद्यापीठे, महाविद्यालये आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून दरमहा ₹२,००० पॉकेट मनी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी इंटर्नशिपच्या संधी अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मोकळेपणाने मांडावेत आणि विद्यापीठे व महाविद्यालयांनी त्यांच्याशी नियमित संवाद ठेवावा, हीच अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. आजचा विद्यार्थी हा उद्याच्या सक्षम समाजाचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या विचारांना योग्य दिशा, संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले.
या प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य, रुईया महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.