सांगलीत ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाचा मिरज रेल्वे स्थानक परिसरातून भव्य शुभारंभ; प्रत्येक नागरिकाने स्वतः किमान एक झाड लावण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

7

सांगली : पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षसंवर्धन ही केवळ शासनाची नव्हे, तर आपल्या वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. याच उदात्त हेतूने सांगली येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हरित महाराष्ट्र ३०० कोटी वृक्ष लागवड अभियान’ अंतर्गत मिरज रेल्वे स्टेशन परिसरात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या देशव्यापी अभियानाचा अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी मिरज रेल्वे स्थानक आणि परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विविध प्रजातींच्या औषधी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांना आणि सांगलीकरांना संबोधित करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाचे (१०० वर्षे) औचित्य साधत २०४७ पर्यंत संपूर्ण राज्यभर तब्बल ३०० कोटी वृक्ष लागवडीचा ऐतिहासिक संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प यशस्वी करणे हे आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी पुढे बोलताना आवाहन केले की, हा महासंकल्प केवळ सरकारी मोहीम न राहता लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतः किमान एक झाड लावून त्याचे मुलाप्रमाणे संगोपन करण्यासाठी पुढे आले पाहिजे.

या प्रसंगी आमदार सुरेश खाडे, पोलीस आयुक्त तुषार दोषी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, मकरंद देशपांडे, वन विभागाचे सागर गवते, प्रशांत वरुडे, मयूर शेळके, बाळासाहेब व्हनमाने तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.