स्वच्छ भारत अभियानाला देशातील सर्व नागरिकांचा सहभाग असल्याने अभियान यशस्वी ठरले आहे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे : पुणे महानगरपालिका येथे दक्षिण गोलार्धातील विविध देशांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसमवेत पुणे शहरातील शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि पुणे महानगरपालिका व कचरा वाचकांच्या स्वच्छ मॉडेल संदर्भात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले असून यात देशातील सर्व नागरिकांचा सहभाग असल्याने अभियान यशस्वी ठरले आहे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात विविध चांगले उपक्रम राबविण्यात आले. पुणे शहरानेदेखील अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. येथील ‘स्वच्छ मॉडेल’ यशस्वी ठरले आहे. जगातील प्रतिनिधींनी या कार्याची दखल घेणे ही अभिमानाची गोष्ट आहे. शहराला भेट देण्यासाठी आलेले प्रतिनिधी हे आपापल्या देशातील महत्वाचे अधिकारी असून त्यांच्या देशातील घनकचरा व्यवस्थापनासाठी ही भेट उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था व कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत समितीच्या संस्थापक लक्ष्मी नारायण यांनी कचरा वेचकांच्या कामाची पद्धत, स्वच्छ व केकेपीकेपी संस्थेची स्थापना व कामकाज याविषयी यावेळी माहिती दिली.

यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंटचे प्रमुख अतुल विश्वास आदी उपस्थित होते.