पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : कृषी विभागाच्यावतीने कृषी महाविद्यालय येथे आयोजित दुसऱ्या ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा-२०२६’च्या समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, हेमंत रासने,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल तसेच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
ख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्यामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष योगदान आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी तब्बल १ हजार २९० अर्ज प्राप्त झाले असून विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील चार संशोधन प्रकल्पांचे उत्पादन प्रत्यक्षात सुरू झाले असून आणखी १२ उत्पादने लवकरच बाजारात येणार आहेत.
या स्पर्धेतून केवळ कल्पना मांडल्या जात नाहीत, तर त्या प्रत्यक्ष उत्पादनात उतरून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतात. यंदाच्या स्पर्धेतील १८ निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत व मार्गदर्शन देण्यात येणार असून त्यापैकी किमान १२ प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
यावेळी हॅकेथॉनमधील विजेत्या इनोव्हेटर्सना देवेंद्रजी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्र अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि शेतकरीहिताचे करण्यासाठी तरुणाईने मांडलेल्या अभिनव संकल्पना निश्चितच प्रेरणादायी आहेत, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६ अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. प्रत्येक स्टॉलवर थांबून त्यांनी संशोधकांशी आणि युवा उद्योजकांशी थेट संवाद साधत त्यांच्या संकल्पना समजून घेतल्या आणि त्यांच्या संशोधनाचे कौतुक करीत प्रोत्साहनही दिले.