जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेच्या आढाव्यासाठी जिल्हास्तरावर शासनाची मंजुरी घेऊन स्वतंत्र समिती नेमण्यात येईल – चंद्रकांत पाटील
पुणे: पुणे जिल्ह्यातील वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांचा आढावा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेच्या आढाव्यासाठी जिल्हास्तरावर शासनाची मंजुरी घेऊन स्वतंत्र समिती नेमण्यात येईल आणि समितीकडून दर तीन महिन्यांनी योजनेच्या प्रगतीबाबत आढावा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
त्यासोबत बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, शेळ्या मेंढ्यांचे गट पुरविणे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांना वास्तविक मिळालेल्या लाभाबाबत माहिती घेण्याचे अधिकाऱ्यांना आदेश यावेळी पाटील यांनी दिले. तसेच लोकप्रतिनिधींकडून आदिवासी भागातील विकासकामांची माहिती घेऊन तेथील सुविधा निर्मितीकडे लक्ष देण्यात यावे. यासाठी निधी कमी पडल्यास सर्वसाधारण योजनेतून निधी देण्याबाबत सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड,जिल्हा नियोजन समिती सदस्य आदी उपस्थित होते आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.