गुहागरमधील श्री व्याडेश्वर व दुर्गादेवी मंदिरात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले सपत्नीक दर्शन; राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केली प्रार्थना
गुहागर : कोकणच्या निसर्गसंपन्न आणि आध्यात्मिक वारशाने समृद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक श्री व्याडेश्वर मंदिर आणि श्री दुर्गादेवी मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊन बळीराजाला या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे सामर्थ्य मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी देवचरणी केली.
या दौऱ्यादरम्यान प्राचीन मंदिरांचे पावित्र्य, येथील भक्तिमय वातावरण आणि कोकणच्या भूमीला लाभलेला समृद्ध धार्मिक-सांस्कृतिक वारसा अनुभवताना मनाला विशेष समाधान लाभल्याची भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.
दर्शन घेतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट ओढवले असून, या संकटावर मात करण्यासाठी राज्याला बळ मिळो आणि शेतकरी बांधवांना या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे सामर्थ्य लाभो, अशी प्रार्थना भगवान श्री व्याडेश्वर आणि दुर्गादेवी मातेच्या चरणी केली आहे. तसेच राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो, हीच मनोकामना व्यक्त केली.