गणेश मूर्ती साकारणारे कारखाने होणार सुरू, आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश

14

अलिबाग,जि.रायगड, दि.5 (जिमाका) : – करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण देशासह राज्यातही दि. 17 मे पर्यंत लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे आपल्या रोजगाराची चिंता असणाऱ्या अनेकांसह बाप्पाची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकारांचीदेखील चिंता वाढली होती. गणेशोत्सवासाठी साडे तीन महिन्याचा कालावधी राहिला असताना बाप्पाची मूर्ती साकारायला मूर्ती कारखाने बंद असणे, मूर्ती साकारण्यासाठी लागणारी माती व साहित्य उपलब्ध नसणे आदी समस्यांबाबत गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यातील मूर्तीकारांनी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांची प्रत्यक्ष भेट घेवून आपल्या समस्या मांडल्या होत्या. 

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासनाकडे लॉकडाऊन काळात कारखाने सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता शासनाने गणेश मूर्ती साकारण्यासाठी रायगड मधील कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली असून यामुळे गणेश मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारखान्यात काम करताना मजूरांनी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा माहिती कार्यालया मार्फत देण्यात आली आहे.