२३ गावं आणि राजकीय बारा भानगडी

हो असचं म्हणावं लागेल कारण जेंव्हा पासून या गावांचा समावेश पुणे महानगरपालिका हद्दीत झाला तेंव्हा पासून १२ नाहीतर जास्तच भानगडी पुण्यात घडत आहेत. राज्यशासनाने आदेश काढला खरा पण तो आदेश कमी आणि खडा जास्त होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 
गावांचा समावेश हा २०२२ ची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात  आला आहे. त्याचप्रमाणे ज्या घाईने गावांचा समावेश केला त्यासाठी काही विकासनिधी राज्यशासन देणार आहे का ? असा हि प्रश्न महापौर, पक्ष नेते आणि स्थायीसमिती अध्यक्ष यांनी विचारला,  उत्तर सोडाच पण या गावांचा विकास आराखडा सुद्धा पी एम आर डी ए करणार असल्याचे राज्यसरकारकडून जाहीर करत  भाजपला चांगलाच  झटका महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री दादांनी दिला. खास सभेचा  डाव मांडण्याआधीच विस्कटल्याने पत्रकारांना उत्तर देताना भाजपच्या तीन शिलेदारांची दमछाक झाली. 


राष्ट्रवादीने कार्यालयाच्या शुभारंभानंतर पुण्यात उत्साहात कामाला सुरवात केल्याचे चित्र आहे. उदघाटनानंतर घडलेला हा घटनाक्रम पाहता भाजप पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी कार्यालयात देण्यात आलेले चहापान म्हणजे भाजपचा सेंड ऑफ तर नाही ना ? असाच प्रश्न उभा राहतो. अत्यंत अभ्यासू आणि अनुभवी शहराध्यक्ष योग्य वेळी देऊन राष्ट्रवादीने पाहिलं आणि योग्य पाऊल टाकलं. २३ गावांच्या गाव भेटी आयोजित करून राष्ट्रवादीने आघाडी घेतली आणि प्रास्ताविक विकासासंदर्भात हि भेट असल्याचे त्यांच्या प्रसिद्धी फलकांमधून दिसत होत. स्थानिक नगरसेवक, आमदार आणि जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांना घेऊन राष्ट्रवादीने कामाचा धडाका लावला. हे सर्व घडत असताना पक्ष प्रवेश देखील मोठ्या प्रमाणात घडवून आणण्यात राष्ट्रवादी पुढे राहिली. 


भाजपने हि मागे न राहता प्रभारी नगरसेवक नियुक्त करून २३ गावांची जबाबदारी आपल्या नगरसेवकांना दिली आणि आपणही शर्यतीत कुठे कमी नाही दाखविण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता संपूर्ण शहरात भाजपची ताकद आहे पण सांस्कृतिक शहर असल्याने  इव्हेंट संस्कृतीची लागण भाजपला झाली का ? प्रश्न पडतो. दस  में ए. सी.  बस दाखवून नंतर जनतेला घाम फोडणाऱ्या राज्यकर्त्यांना जनतेच्या पुढे मत मागताना घाम गाळावा लागणार आहे. कोरोनामुळे ए.सी. बंद आहे पोस्ट करणाऱ्यांनी कार्यक्रम पण थोडा पोस्ट पौंड केला असता तरी चालेले असते. भाजपने २३ गावांचा विषय गांभीर्याने घेतलाच असेल पण प्रभारी म्हणून नेमण्यात आलेले प्रभारी नगरसेवक फेसबुक पोस्ट तयार करून अतिरिक्त पदभार मिळाल्याचा सोहळे सोशल मीडियावर साजरे  करत आहेत. 


लॉक डाऊन, बेरोजगारी, इंधन दर वाढ, कोरोना लसीकरण तुटवडा यामध्ये नागरिकांचे झालेले हाल पाहता भाजपमध्ये पक्ष प्रवेश मंदावले आहेत. ज्या गावांचा समावेश करण्यात आला आहे त्यापैकी बहुतांश  शहारालगतचा भाग आहे  ज्यामध्ये राष्ट्रवादीची पकड आहे पण भाजप  गेम चेंजर आहे हे पिंपरी चिंचवडच्या मागील निकाल वरून नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे चंद्रकांत दादांनी नक्की काय रणनीती आखली आहे ? कोणता कानमंत्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे हे येत्या काळात समजणार आहे. 
पण आधीची ११ आणि आताची २३ गाव शहरात आल्यापासून राजकीय १२ भानगडींना पुण्यात सुरवात झाली आहे हे नक्की. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!