प्रवीण दरेकरांविरोधात रुपाली चाकणकर यांची पोलिसात तक्रार; ‘मुका’ घेण्याचं वक्तव्य पडल महागात
पुणे: विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकर यांच्या विरोधात कलम 501 नुसार तक्रार दाखल केली आहे. प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं म्हटलं होतं. त्यावरुनच महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात तक्रार केली.
प्रवीण दरेकर यांनी इतक्या दिवसात महिलांची माफी मागितली नाही, त्यांनी महिलांना लज्जा होईल असं वक्तव्य केलं. उर्मटपणाची प्रतिक्रिया दिली, त्यामुळे मी स्वत: पोलिसात तक्रार दिली आहे. कायद्याच्या चौकटीत मला न्याय मिळेल अशी आशा आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
प्रविण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी….
कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात FIR दखल केले आहे..(1/2)@maharashtra_hmo @mipravindarekar @CPPuneCity pic.twitter.com/2KQUgieHka
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 22, 2021
प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले होते?
पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे. सुभेदारांचा पक्ष, कारखानदारांचा पक्ष, बँकावाल्यांचा पक्ष, उद्योगपतींचा पक्ष आहे. मात्र भाजप हा सर्वसामान्यांचा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं प्रवीण दरेकर म्हणाले.
दरेकरांच्या बोलण्याला राष्ट्रवादीत सुरु असलेल्या पक्षप्रवेशची पार्श्वभूमी होती. सुप्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.