काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचं पुण्यात उपचारादरम्यान निधन

9

पुणे: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, तथा विधान परिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

शरद रणपिसे यांच्या हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. गेली चार ते पाच दिवस त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. मात्र आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

कोण होते शरद रणपिसे?

शरद रणपिसे यांचा जन्म 18 सप्टेंबर 1951 रोजी पुण्यात झाला होता. पुण्यातच त्यांचं बालपण गेलं. महाविद्यालयीन शिक्षण देखील त्यांनी पुण्यनगरीतच घेतलं. पुढे महाविद्यालयीन जीवनातच त्यांना राजकारणाचं वेड लागलं. पुढे काही काळातच त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली.

बी कॉम पर्यंतचं त्यांचं शिक्षण झालं होतं. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा त्यांना अवगत होत्या. विधिमंडळात अभ्यासू आणि संयमी भाषण करण्यात ते तरबेज होते. विविध विषयांवर काँग्रेसची बाजू ते मांडायचे. विधिमंडळातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना व्हायची. महानगरपालिकेपासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असा राहिला. विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते म्हणून त्यांनी उत्तम काम पाहिलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.