संतापजनक ! नागपूरात तरुणीवर सामूहिक बलात्कार

नागपूर: माधव नगरी परिसरात तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला. प्राथमिक वृत्तानुसार तरुणी प्रियकरासोबत रस्त्याच्या कडेला उभी राहून बोलत होती त्यावेळी तिथे आलेल्या चौघांनी तरुणीच्या प्रियकराला मारहाण करुन जखमी केले. नंतर तरुणीला जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यात तरुणी जखमी झाली. ही धक्कादायक घटना रात्री आठच्या सुमारास घडली. पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केले. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

तरुणीवर ओढवलेल्या प्रसंगामुळे नागपूरमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या भागांमध्ये गस्त वाढवण्याचे संकेत दिले आहेत. काही कुटुंबांनी घरातील मुली आणि महिलांना विशिष्ट वेळेत घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणात तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल; असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.

याआधी महाराष्ट्रात साकीनाका, डोंबिवली, पुणे, महाबळेश्वर या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या. आता नागपूरमधील घटनेने बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये आणखी एक भर पडली. सातत्याने होत असलेल्या या गुन्ह्यांमुळे राज्यातील महिलांमध्ये असुरक्षित असल्याची भावना वाढत आहे. राज्य शासनाने महिला सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाय करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.