कोरोना काळात महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करणे महत्वाचे – रुपाली चाकणकर

पुणे: सध्या कोरोनाचा काळ आहे. या कालावधीत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे महत्वपूर्ण असल्याचे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले. राजयोग प्रतिष्ठाण व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी रुपाली चाकणकर बोलत होत्या.

यावेळी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, स्थानिक नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेविका सायली वांजळे, खडकवासला अध्यक्ष काका चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती येणपुरे, संयोजक नीलम डोळसकर, अरुण पाटील उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कायमच अशा प्रकारे सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. कोरोनाच्या काळात महिलांनी अधिक जागरूक राहण्याची वेळ आली आहे, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

वारजे येथील कै. अरविंद बारटक्के दवाखान्यात जनरल तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, ई. सी. जी., ब्लड शुगर तपासणी, हिमोग्लोबिन, वजन, उंची, बॉडी मास इंडेक्स, सांधे दुखी, गुडघे दुखी व इतर अस्थीरोगंशी संबंधित आजारांवर उपचार व सल्ला औषधोपचार, बी 12 लेव्हल, महिलांच्या कॅन्सर करीता स्क्रिनिंग (गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर) पुणे महापालिकेतर्फे उपलब्ध करून दिल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

बाबा धुमाळ म्हणाले, दर वर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक समाजयोगी कार्यक्रम करीत असतात. आता नवरात्र महोत्सव पार्श्वभूमीवर आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. तज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत, कॅन्सरवर उपाययोजना करता येणार आहे. रविवारी (10 ऑक्टोबर) महिला आणि पुरुष 25 भजनी मंडळे कीर्तन सादर करणार आहेत.