उद्धवजी, मी बाळासाहेबांकडून प्रेरणा घेऊन हे केले; नारायण राणे म्हणतात…

12

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य पाहायला मिळालं. तब्बल 16 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही. इतकंच नाही तर नारायण राणे यांनी व्यासपीठावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला.

याच मुद्द्यावरून कार्यक्रमादरम्यान राणेंनी केलेल्या भाषणात राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या पायाभूत सुविधा तयार झाल्या, यासाठी कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचे नाव तिथे येऊच शकत नाही, असे राणे यावेळी म्हणाले. माझा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. ९० साली मला बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून मी इथून निवडणूक लढवली आणि निवडून आलो. जिल्ह्यातल्या अडचणी जाणून घेतल्या. फेब्रुवारीनंतर जिल्ह्याला पाणी नव्हतं. पुरेसे रस्ते नव्हते.

महामार्गाची दुर्दशा होती. अनेक गावांना वीज नव्हती. यानंतर या भागाचा विकास मी केला. उद्धवजी, मी बाळासाहेबांकडून प्रेरणा घेऊन हे केले, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे .आजच्या कार्यक्रमात येऊन राजकारण करू नये, असे मला वाटत होते. चिपी विमानतळावरून उडणारे विमान डोळे भरून पाहावे. विमानतळाचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून शुभेच्छा द्याव्यात.

विमाने पाहून आनंद वाटला. मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्रीसाहेब भेटले. माझ्या कानात काही तरी बोलले, पण मी त्यातला एकही शब्द ऐकला नाही, असेही राणे म्हणाले .जेव्हा शिवसेनेची सत्ता १९९५ साली आली होती. देशातला एकमेव जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा झाला.

त्यानंतर इथे सर्व प्रकारच्या विकासासाठी तरतुदी करण्यात आल्या. साहेबांच्या आशीर्वादानंतर मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. गोपीनाथ मुंडेंना सांगून ब्रीज आणि रस्त्यांसाठी १२० कोटी दिले. हे श्रेय मी घेत नाही. त्यावेळी शिवसेना होती. साहेबांचे श्रेय आहे. माझं नाही, असेही राणे म्हणाले . तसेच राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची तक्रार केली. बाळासाहेबांना खोटं बोलणं कधीच आवडलं नाही. खोटं बोलणाऱ्याला साहेबांजवळ थारा नव्हता. उद्धवजी, तुम्हाला चुकीची माहिती ब्रीफिंग केली जात आहे. त्यात सत्य नाही.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.