मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई: मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’मुळे पालिकेच्या ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या व्हॉट्सअपवर सहज मिळेल. यासाठी 8999228999 हा नंबर आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करुन थेट महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’शी व्हॉट्सअपवर संपर्क साधता येईल. मुंबई महापालिकेचा ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळातील महापालिकेच्या कामाचे कौतुक केले. महापालिका तंत्रज्ञानाचा प्रभावीरित्या वापर करत आहे. यापुढेही महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन जास्तीत जास्त सेवा सोप्या आणि डिजिटल पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करुन द्याव्या; असे मुख्यमंत्री म्हणाले.

पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबईकरांची ५०० चौ.फुटाच्या घरकुलावरील घरपट्टी माफ केली आहे. कोस्टलरोडचा बोगदा मावळा यंत्राने पूर्ण केला आहे. आता मुंबईकरांना ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’द्वारे अनेक सुविधा सहज उपलब्ध होत आहेत; असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महापालिकेने जनसंपर्क मोहिमेतून पालिकेच्या विविध उपक्रमांची माहिती वेळोवेळी नागरिकांना द्यावी; असेही मुख्यमंत्री म्हणाले.