शिवसेना आमदाराचा जबरदस्तीने दुकाने बंद करतानाचा ‘व्हिडीओ’ व्हायरल

मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या मुळेच हा बंद आहे. या बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर काही ठिकाणी मात्रनागरिक, व्यापारी, दुकानदारांनी बंदला विरोध दर्शवला आहे. तिकडे कणकवलीत मात्र बंदला विरोध करणाऱ्या दुकानदाराला सेना आमदार वैभव नाईक दमदाटी करत असल्याचा आणि शिवसैनिक जबरदस्तीने दुकाने बंद करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महाविकास आघाडीच्या या बंदमध्ये मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी १० च्या आसपास सेना आमदार वैभव नाईक कणकवली शहरात बंदचा आढावा घेत असताना त्यांना काही दुकाने उघडी दिसली. त्यावर भडकलेल्या नाईक यांनी व्यापारी, दुकानदारांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, शिवसेना आमदार वैभव नाईक व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचे सांगताना दिसत आहेत. वयाने जेष्ठ असणा-या व्यापाऱ्याला वैभव नाईक यांनी दमदाटी केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते देखील व्यापा-याच्या अंगावर धावून जाताना आणि दुकानांचे शटर खाली खेचताना दिसत आहेत.