उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 125 पैकी 50 महिला उमेदवार

दिल्ली: देशभरातील पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या दरम्यान, उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. काँग्रेस प्रभारी प्रियंका गांधी यांनी यादी जाहीर केली असून या यादीत 50 महिला उमेदवारांसह 125 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली लिस्ट जारी केली. या लिस्टमध्ये 125 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत. त्यात 50 महिला उमेदवार आहेत. प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये फक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नाहीत. तर उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईही काँग्रेसने उमेदवारीची संधी दिली आहे.

मोठ्या नावांबद्दल बोलायचं झालं तर सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद यांना तिकीट मिळाले आहे. सदफ जाफर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. उन्नावमधून काँग्रेसने आशा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या मुलीवर अत्याचार झाले होते. यानंतर उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला. याशिवाय NRC-CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या सदफ जाफर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय पूनम पांडे यांनाही तिकीट मिळाले आहे.