जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर तर शिवसेनेला उपाध्यक्षपद

जळगाव: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याची उत्सुकता अखेर संपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात अखेर जळगाव जिल्ह‍ा बँक अध्यक्षपदाची माळ पडली आहे. तर, शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्यात आलं असून श्याम सोनवणे हे उपाध्यक्ष होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी चेअरमनपदासाठी गुलाबराव देवकर यांना तर शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी श्याम सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तब्बल एक ते दीड महिन्यांपासून जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. आज जिल्हा बँकेत पहिल्या तीन वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांना संधी देण्यात आली आहे. तर,शिवसेनेनं श्याम सोनवणे यांची निवड केलीय.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 20 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली होती. यानंतर काल शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. यात राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना देण्यात आले होते.

तब्बल तासभर खडसे यांच्यासह संचालकांच्या झालेल्या बंददाराआड बैठकीत पहिल्या तीन वर्षांसाठी अध्यक्षपदाची माळ गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात पडली आहे. तर सेनेकडून पुढील दोन वर्षांसाठी उपाध्यक्षपदी श्याम सोनवणे राहणार आहेत.