‘ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं’

औरंगाबाद: भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. यावेळी बोलताना पंकजा म्हणाल्या, नरेंद्र मोदींनी देशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजाला 10 टक्के आरक्षण देऊ केलं. तर, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन बोलताना त्या म्हणाल्या देवेंद्र फडणवीस यांनीच ते महाराष्ट्राला दिलं. तसेच, राज्य सरकारने पोटनिवडणुकांच्या अगोदरच हा अध्यादेश का काढला नाही?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

भाजपच्या ओबीसी मोर्चाकडून ओबीसी जागर अभियानांतर्गत औरंगाबादमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना पंकजा यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे सांगितले. आता एक नवीनच षडयंत्र सुरू झालं आहे. बहुजनाची व्याख्या खराब करण्याचं हे षडयंत्र आहे. इकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उचलला की, तिकडे कोणीतरी षड्यंत्रकारी लोक मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा काढतात. अरे मराठा समाजाच्या पाठीवर खंजीर खुपसण्याचं कामही तुम्हीच केलंय. ज्या मुख्यंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढत होतात, त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंय, असे पंकजा यांनी म्हटले.

मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्या मराठा समाजाचं आरक्षण आज संपुष्टात आलं. ओसीबी समाजाचं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो, ते आरक्षण आज संपुष्टात आलं. आज महाराष्ट्राचं राजकीय भविष्य काय, येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओसीबी समाजाच्या डोक्यावर टांगती तलवार देण्याचं काम सरकारने केलंय, असे म्हणत पंकजा यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, सरकारने काढलेला ओबीसी समाजाच्या राजकीय अध्यादेश टिकला पाहिजे, सरकारने आगामी निवडणुकांसाठी तो टिकवून दाखवावा, तसं झाल्यास आम्ही सरकारचं कौतुक करू. पण, ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं नाही, तर रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही पंकजा यांनी यावेळी दिला.