राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका – चित्रा वाघ
पुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली, असून लवकरच औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पहाता हे पद गेली दीड वर्ष रिक्त ठेवल्याने विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु यावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कडाडून टीका केली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चाकणकरांच्या निवडीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असताना भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चाकणकर यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यासंबधीचे ट्वीट त्यांनी केले आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजीरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका.अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल”
कोण आहेत चित्रा वाघ
चित्रा वाघ सध्या भाजपा आहेत. मात्र, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा असल्यापासूनच त्या चर्चेत आहेत. अखिल भारतीय सेनेतून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. सतत राज्यभर दौरे करणाऱ्या चित्रा वाघ यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात दाखल झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधून भाजपात जाणाऱ्या नेत्यांची रीघ लागली होती. त्याच काळात चित्रा वाघ यांनी कमळ हाती घेतलं होतं.
महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे
अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका
अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 14, 2021
चित्रा वाघ यांनी भाजपाची वाट धरली, तेव्हा चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणाच्या चौकशीच्या फेऱ्यापासून वाचण्यासाठी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली गेली होती. हे प्रकरण चर्चेत असताना चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गंत गटबाजीमुळं त्या नाराज होत्या आणि म्हणून त्यांनी पक्ष सोडला असल्याचंही बोललं गेलं होतं.