‘मी मुख्यमंत्री आहे असं मला कधीच वाटत नाही, तुम्ही वाटून घेऊ नका’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना चिमटा

मुंबई: ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा असा मायचा पूत जन्माला आलेला नाही. त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू, असं म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय. पद येतील आणि जातील, सत्ता येईल आणि जाईल पण अहमपणा तुझ्या डोक्यात जाऊ देऊ नको ही शिकवण मला आजोबांनी आणि वडिलांनी दिली, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
मी मुख्यमंत्री आहे असं कधीच तुम्हाला वाटायला नको, मलाही वाटायला नको. मी तुमचा भाऊ आहे, तुमच्या घरातला सदस्य आहे असंच तुम्हाला वाटलं पाहिजे. पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणत आहेत की मी गेलोच नाही. मी पुन्हा येईन असं मी कधीच म्हटलं नव्हतं जनतेच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणाच्या सुरूवातीलाच देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
माझ्या आई वडिलांचे आणि आजोबांचे संस्कार माझ्यावर आहेत. मला त्यांनी हे सांगितलं होतं की कधीही हवा डोक्यात जाऊ देऊ नकोस. ते मी होऊ दिलेले नाही. माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही. सत्तेची किंवा कशाचीही हवा माझ्या डोक्यात गेलेली नाही. ज्यांना गर्व झाला ते आज कुठे बसलेत त्यांनी आहेत तिथे बसून रहावं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं आहे. मी मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं आहे असं एकजण म्हणाले होते. ते शक्य झालं असतं जर त्यांनी आम्हाला दिलेलं वचन कदाचित मोडलं नसतं असं देखील उद्धव ठाकरेंनी सुनावलं आहे.
शिवसेनेचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. शिवसेनेचा आवाज दाबणारा आज नाही कधीच जन्माला येऊ शकत नाही. आज विजयादशमीच्या सगळ्यांना आज शुभेच्छा देतो आहे. दसरा मेळाव्याची जी परंपरा शिवसेना प्रमुखांनी सुरू केली ती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. शस्त्रपूजा झाल्यानंतर मी तुमच्यावर फुलं उधळली कारण माझी शस्त्रं तुम्ही आहात असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.