भाजपला मोठा झटका, काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा मोठा विजय

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा ४१ हजार ९१७ मतांनी पराभव केला. या विजयाने काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे.

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूरच्या जागेसाठी ३० ऑक्टोबरला मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली होती. पंढरपूर पोटनिवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, देगलूरच्या मतदारांनी काँग्रेसवर विश्वास टाकला. देगलूरची पोटनिवडणूक जिंकून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे नेते अशोक चव्हाण यांनी आपला बालेकिल्ला कायम राखला आहे.

या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना १ लाख ८ हजार ७८९ तर भाजपचे सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले, त्यांना ११ हजार ३४७ मते मिळाली.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!