भाजपला मोठा झटका; दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय

मुंबई: दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी बाजी मारली आहे. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावित यांचा 47447 मतांनी पराभव केला आहे. कलाबेन डेलकर यांच्या विजयामुळे महाराष्ट्राबाहेर प्रथमच शिवसेनेचा खासदार विजयी झाला आहे.

दादरा नगर हवेलीतील माजी खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे लोकसभेची ही जागा रिक्त झाली होती. कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने कलाबेन यांना तिकीट दिलं होतं. आज झालेल्या मतमोजणीत कलाबेन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार महेश गावीत यांचा 47 हजार 447 मतांनी पराभव केला.

दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईत आत्महत्या केली होती. मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचे महाराष्ट्र विधानसभेत पडसादही उमटले होते.

मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.

Read Also :

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!