उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही!

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.

काय होती बातमी?

जरंडेश्वर साखर कारखान्यासह अजित पवार, पार्थ पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. जरंडेश्वर साखर कारखाने, दिल्लीतील फ्लॅट, पार्थ पवार यांचं निर्मल बिल्डिंग येथील कार्यालय, गोव्यातील रिसॉर्टसह जवळपास 1000 हजार कोटी बाजारमूल्य असलेल्या मालमत्ता जप्त करण्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला अशी बातमी होती.

जरंडेश्वर सहकारी कारखाना. आयकर विभागाच्या माहितीनुसार याचं बाजारमूल्य 600 कोटी रुपये असून, हा कारखाना आधीच जप्त केलेला आहे. अजित पवारांशी संबंधित असलेला दक्षिण दिल्लीतील अंदाजे 20 कोटी रुपयांचा फ्लॅट. पार्थ पवार यांचं मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात असलेल्या निर्मल बिल्डिंगमधील कार्यालय. या कार्यालयाचे अंदाजे किंमत 25 कोटी रुपये आहे असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र अजित पवार यांच्या वकिलांनी अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचं म्हटलं आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!