मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता नवाब मलिकांच्या विरोधात FIR दाखल करावा- आशिष शेलार
मुंबई: भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून मलिक कुटुंबियांनी जमीन खरेदी केली असा आरोप फडणवीस यांनी केला. त्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांच्यावर निशाणा साधला तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच नवाब मलिक यांच्या विरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध उघड केले आहेत. मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिशी समोर आले आहे. आता मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?, असा सवाल करत मुख्यंत्र्यांनी आता मलिकांविरुद्ध FIR दाखल करावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. असा आरोप आता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.