लग्न जुळत नसल्याने परभणी जिल्ह्यातील 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या

परभणी: परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात मन हेलावणार्‍या एका घटनेत एका युवकाने लग्न होत नसल्याच्या कारणातून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. युवकाने आपल्या राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भागवत आसाराम टगुळे असं आत्महत्या केलेल्या 23 वर्षीय युवकाचं नाव आहे. भागवत हा मानवत तालुक्यातील बोंदरवाडी येथील रहिवासी आहे. हरिभाऊ टगुळे यांच्या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाने गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या आई वडिलांकडे लग्नासाठी तगादा लावला होता. अनेक स्थळं पाहूनही त्याचं लग्न जुळत नव्हतं आणि त्याला मनासारखी मुलगी मिळत नव्हती. त्यामुळे भागवतला नैराश्य आलं. मानसिक तणावाखाली असलेल्या या तरुणाने सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. एवढ्या कमी वयात लग्न होत नसल्यामुळे तरुणाने अशाप्रकारे अचानक आयुष्याचा शेवट केल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.