धक्कादायक: दारू प्यायला पैसे देत नाही म्हणून, पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातले एक किलो वजनाचे माप

नाशिक: आईने दारू पिण्यास पैसे न दिल्यामुळे पोटच्या मुलाने एक किलो वजनाचे लोखंडी माप तिच्या डोक्यात मारून दुखापत केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनाबाई संतू व्यवहारे ( ६०, रा. संत कबीर नगर, भोसला मिलिटरी स्कूलच्या मागे, महाराष्ट्र बेकरी समोर ) या त्यांच्या घरी एकटया असताना त्यांचा मुलगा बाळू संतोष व्यवहारे (25,रा. संत कबीर नगर, भोसला मिलिटरी स्कूलच्या मागे, महाराष्ट्र बेकरी समोर, नाशिक ) याने यमुनाबाई यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

यावेळी आईने पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाचा राग अनावर झाला. त्याने आईला शिवीगाळ करत घरात असलेले एक किलो वजनाचे लोखंडी माप यमुनाबाईच्या डोक्यात घालत दुखापत केली. तू जर मला दारू पिण्यासाठी पैसे नाही दिले तर मी तुझ्याकडे पाहून घेतो असा दम दिला. यमुनाबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बाळू याच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास हवालदार दिगंबर मोरे करीत आहेत.