शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी सुनील शिंदे यांना उमेदवारी जाहीर

16

मुंबई: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीची जागा सोडणाऱ्या मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा पत्त कट करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे कदम यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी त्यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. त्यानंतर शिंदे यांनी संघटनात्मक कामात स्वत:ला झोकून दिलं होतं. मात्र, आता विधान परिषदेच्या दोन जागा रिक्त झाल्याने मुंबईतून शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत सेनेकडे अधिक नगरसेवक असल्याने भाजप एक जागा लढवणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या सात मतदारसंघांतील आठ सदस्यांची मुदत 1 जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोलापूर व नगर वगळता उर्वरित सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 23 नोव्हेंबरला अर्ज दाखल केले जातील. 24 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत 26 नोव्हेंबर असून, 10 डिसेंबर रोजी मतदान आणि 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.