“मॅडम माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो आहे”; क्रांती रेडकर यांना निनावी मेसेज

मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे मागील अनेक आठवड्यांपासून आरोप करत आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर मलिक यांनी समीर वानखेडेंनी ते मुस्लीम असल्याचं लपवून आरक्षणाचा लाभ घेत नोकरी मिळवल्याचा आरोप केला. त्यानंतर वेळोवेळी कधी ट्विटरवरुन तर कधी थेट पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप केले.

समीर यांच्या बाजूने त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रसारमाध्यमांसमोर बाजू मांडण्यास सुरुवात केली. क्रांती आधी मलिक यांचं नाव घेणं टाळत होती मात्र आता ती थेट नाव घेऊन टीका करु लागलीय. मलिक आणि वानखेडे वादामधून क्रांती आणि मलिक यांच्या कन्येमध्येही ट्विटरवर नुकताच वाद झाला. असं असतानाच आता नवाब मलिक यांनी क्रांती रेडकरच्या चॅटचा एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत तिच्यावर निशाणा साधलाय.

मागील काही आठवड्यांपासून वानखेडे कुटुंबीय वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन आपली बाजू मांडत आहेत. दरम्यानच्या काळात नवाब मलिक यांनी दाऊदशी संबंधित संपत्ती घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर मलिक यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. याच वादाच्या पार्श्वभूमीवर एका युझरने क्रांतीला मलिक आणि दाऊद कनेक्शनसंदर्भात माहिती असल्याचं सांगितलं. त्याच विषयावरील हे चॅट आहे.

मलिक यांनी शेअर केलेला संवाद हा ट्विटरवरील आहे. यामध्ये एका युजरने क्रांती रेडकरला माझ्याकडे नवाब मलिक यांचे काही फोटो असल्याचं सांगितलं आहे. “क्रांती रेडकर मॅडम माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा संबंध असल्याचे पुरावे आहेत, अधिक माहितीसाठी थेट मेसेज करा,” असं या युझरने म्हटलं आहे. त्यावर रात्री पावणे अकराच्या सुमारास क्रांती रेडकरने, “तुमच्याकडे काय पुरावे आहेत?”, असा रिप्लाय केलाय. “माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो आहे,” असं या युझरने म्हटलंय. त्यावर पुढच्या मिनिटालाच क्रांतीने, “कृपया तो फोटो पाठव. याबदल्यात तुला योग्य तो मोबदला मिळेल,” असा रिप्लाय केलाय. या संवादाचा स्क्रीनशॉर्ट मलिक यांनी, “अरे देवा…” अशा कॅप्शनसहीत शेअर केलाय.