‘महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला’ – पंकजा मुंडे
मुंबई: महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून संपूर्ण देश महाराष्ट्राकडे बघत असतो. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्याचा विचार केला आणि राज्याच्या बाहेर आम्ही कुठे गेलो तर पूर्वी लोक महाराष्ट्राचं उदाहरण देऊन काम करत होते. पण आता लोक मला प्रश्न विचारतात तुमच्या महाराष्ट्रात काय चाललं आहे? अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. या सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असाही आरोप पंकजा मुंडे यांनी केला.
महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जे आघाडीचं सरकार आलं त्या आघाडीच्या सरकारने जनतेच्या हिताच्या मार्गावर जायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही. अनेक वर्षे राजकारणात ज्यांना जनतेची नाडी माहित आहे असे लोक सत्तेत आहेत. त्यांनी तरी जनतेचे प्रश्न सोडवण्यास मदत करायला हवी होती.
मात्र जनतेचे प्रश्न सुटताना कुठेही दिसत नाही. सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा. ओबीसीचं आरक्षण रद्द होण्याचा दुर्दैवी निर्णय या सरकारच्या काळात झाला. हे आरक्षण स्थगित झाल्यापासून रद्द होईपर्यंत जो कालावधी गेला त्यामध्येही हे सरकार ओबीसी आरक्षण वाचवू शकलं असतं. मात्र या सरकारने तसे कोणतेही प्रयत्न केले नाहीत असाही आरोप पंकजा मुंडे यांनी केला.
या सरकारकडे बड्या मंत्र्याच्या चुकीच्या गोष्टी पाठीशी घालण्यासाठी निधी आहे. मात्र ओबीसी समाजासाठी आयोग नेमून त्यांना द्यायला निधी नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे अशीही खंत यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येक वेळी हे सरकार केंद्राकडे बोट दाखवतं त्या सरकारला माझा प्रश्न आहे तुम्हाला इम्पेरिकल डेटा म्हणजे काय हे माहित आहे का? मला वाटतं की नाही त्यामुळेच हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. हे तीन तिघाडा आणि काम बिघाडा सरकार आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.