“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या विद्यार्थ्याचे पत्र

मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसर्ग कमी करण्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नाही. त्यामुळे पाचवीतील एका विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहून शाळा सुरु करण्याची विनंती केली. शाळा बंद असल्यामुळे आमचे नुकसान होत, असेही या पत्रात म्हटले आहे.

सोलापूर येथील केंद्रीय विद्यालय, सेंट्रल रेल्वे या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या कौस्तुभ प्रभू याने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आहेत, अशी व्यथा त्याने पत्रात व्यक्त केली आहे. तसेच शाळा बंद असल्यामुळे आमचे नुकसान होत, असेही या पत्रात म्हटले आहे.

काय लिहिलंय पत्रात?

मुख्यमंत्री/शिक्षणमंत्री, महाराष्ट्र शासन, मी कौस्तुभ भूषण प्रभू इयत्ता पाचवीच्या वर्षात केंद्रीय विद्यालय सेंट्रल रेल्वे सोलापूर इथे शिकत आहे. तुम्ही आमच्या आरोग्याच्या काळजीने शाळा प्रत्यक्ष बंद ठेवत आहात. पण ऑनलाइन शिक्षण खेडोपाड्यातील अनेक मुलांना ऑनलाइन सोयीसुविधा अभावी घेणे शक्य होत नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे गणित व विज्ञानासारखे विषय शिक्षक अनुभवी असले तरी शिकवण्याच्या मर्यादा पडतात.

या विषयांचा आमचा शैक्षणिक पाया मजबूत होत नाही. तुम्ही बोलला होता की सरसकट ठिकाणच्या शाळा आधी बंद करणार नाहीत, पण तुम्हीच आता सरसकट शाळा बंद करत आहात, तुम्ही तुमच्या निर्णयावरून असा अचानक मागे का घेत आहात. आम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन परत शाळेत येण्यास उत्सुक आहोत. तुम्ही प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.

दरम्यान, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन या संस्थेनेही मुख्यमंत्र्यांना शाळा सुरू करण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. राज्यातील गोरगरीब मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळा बंद करू नका, असी मागणी मेस्टा संघटनेने मुख्यमंत्री, शाळेय शिक्षणमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!