नवा व्हेरीयंट मिळाल्यानंतर भारत सरकार अलर्टवर, राज्यांना दिल्या या सूचना
मुंबई: कोविड – १९ चा अधिक घातक नवा व्हेरीयंट मिळाल्यानंतर भारत सरकारही अलर्ट झाले आहे. केंद्राने राज्य सरकारला याबाबत नियमावली पाठवली आहे. यामध्ये राज्य सरकारला दक्षिण आफ्रिका, हॉंगकॉंग आणि बोक्सवाना देशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने या व्हेरीयंटवर बारकाईने नजर ठेवत असल्याचे स्पष्ट केले आहे. डब्ल्यूएचओची शुक्रवारी याबाबतची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे कळते. या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा समावेश हा व्हेरीयंट ऑफ कन्सर्नमध्ये करायचा की इंटरेस्टमध्ये करायचा याबाबतचा निर्णय आज होऊ शकतो. याआधी WHO ने युरोपातील कोरोना व्हायरसची सद्यस्थिती पाहता चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, NCDC च्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे की, बोस्तवाना (३), दक्षिण आफ्रिका (६) आणि हॉंगकॉंग (१) अशा स्वरूपात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटच्या रूग्णांची नोंद झाली आहे. या नव्या व्हेरीयंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्यूटेशन्सचा समावेश आहे. आरोग्य सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, या देशांव्यतिरिक्त आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या गाईडलाईन्समध्ये धोकादायक स्थिती असलेल्या देशातील प्रवाशांची चाचणी आणि स्क्रिनिंग करणेही आवश्यक आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईन्सनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या बाबतीत ट्रॅकिंग आणि टेस्टिंग करणे गरजेचे आहे. B.1.1.529 व्हेरीयंट पहिल्यांदा बोत्सवाना येथे आढळला आहे. जीनोमिक सीक्वेंसिंगमध्ये आतापर्यंत १० कोरोना रूग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या व्हेरीयंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन आढळले आहे. त्यामुळेच हा व्हेरीयंट संसर्गाचे कारणही ठरू शकतो.