3 हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावणार महामंडळ

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा एसटीचे विलिनीकरण, पगारवाढ यासाह अनेक मुद्द्यांसाठी संप सुरू आहे. 41 टक्क्यांची पगारवाढ राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने दिल्यानंतरही काही ठिकाणी कर्मचारी संपावर ठाम आहेत. कर्मचारी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीवर ठाम आहेत.

आता एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. पहिल्या टप्प्यात निलंबित झालेल्या सुमारे 3 हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळ बडतर्फीची नोटीस बजावणार असल्याची माहिती मिळाली आहे. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी महामंडळाने 14 दिवसाची मुदत दिली होती. या मुदतीमध्ये काही कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. तर काही कर्मचाऱ्यांनी या नोटीस इकडे दुर्लक्ष केले आहे .

या सर्व कर्मचाऱ्यांचे बाबतीत पुढील कारवाई म्हणून महामंडळ त्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. आपले म्हणणे ज्या कर्मचाऱ्यांनी मांडले नाही आणि दुर्लक्ष केले, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. स्थानिक एसटी प्रशासनाला वरिष्ठ कार्यालयाकडून दिलेल्या आदेशानुसार आता बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना हा मोठा धक्का आहे.