“गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईत येऊन व्हायब्रंट गुजरातसाठी रोड शो करणं भाजपला चालतं का?”
मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली होती. ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेण्यासाठी तर आल्या नाहीत ना? असा सवाल शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आले आहेत. व्हायब्रंट गुजरातसाठी ते रोड शो करत आहेत. भाजपला हे चालतं का? असा सवाल संजय राऊत यांनी शेलार यांना केला आहे.
संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. भाजपच्या आरोप-प्रत्यारोपाला काही अर्थ नाही. हा पोटशूळ आहे. विरोधकांच्या पोटात दुखू लागलं आहे. ममता बॅनर्जी आल्या. उद्योगपतींना भेटल्या. मुंबई औद्योगिक नगरी आहे. या उद्योगपतींचे देशभरात उद्योग आहेत. ते सगळीकडे उद्योग करतात. ममतांनी म्हटलं कोलकात्यातही लक्ष द्या. त्यात चुकलं काय? असा सवाल राऊत यांनी केला.
ममता बॅनर्जी या काय मुंबई लुटायला, ओरबडायला आल्या आहेत का? ममता बॅनर्जी मुंबई लुटायला आल्या असं जे म्हणत आहेत ते मूर्ख लोकं आहेत. माझा प्रश्न आहे की आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अर्ध मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. व्हाटब्रंट गुजरातसाठी ते मुंबईत आले. व्हायब्रंट गुजरात तिकडे. मुंबईत काय कशासाठी? व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शो करता, उद्योगपतींना आकर्षित करता ते चालतं का? यालाच मी लूट म्हणतो, असं ते म्हणाले. भाजपला आरोप करू द्या. त्यांना आरोपांचे जुलाब होत आहेत. त्यांना आरोपांचा डायरीया झाला आहे. त्यांना तोंडाचा डायरीया झाला आहे. दुर्गंधी काही काळ निर्माण करतात. त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असा हल्लाही त्यांनी चढवला.