आमच्या आदर्शांनाच अपमानित केलं जात असेल तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे?

13

नाशिक: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आता राजकीय वाद सुरु झाला असून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्टीटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. स्वा. सावरकर आणि अन्य प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा नामोल्लेख टाळत, ‘जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?‘ असा नाराजीचा सवाल केला आहे.

साहित्य संमेलनात वीर सावरकरांचा यथोचित सन्मान करण्यात आला नाही. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?, असा सवाल करतानाच नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.