हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर आढळलेली संशयित बोट ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लाँडर्सगन या महिलेची; विधानसभेत फडणवीसांची माहिती
मुंबई: रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी बेवारस स्थितीत एक बोट आढळली आहे. यानंतर मात्र प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मुंबई मध्ये सर्वकडे नाकाबंदी करण्यात आली होती. आढळलेल्या बोटींमध्ये तीन AK-47 रायफल्स आणि अॅम्युनिशन आढळून आलं आहे. मात्र भारतात घातपात घडवण्याचा हेतू यामागे नव्हता, असेच प्रथम दर्शनी दिसत असल्याचे तपास यंत्रणांना आढळले आहे. ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लाँडर्सगन या महिलेच्या मालकीची असल्याची माहीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.
फडणवीस म्हणाले, याबाबत कोस्टगार्ड आणि इतर यंत्रणांना तात्काळ याची माहिती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या बोटीचं नाव ‘लेडी हान’ असं असून या बोटीची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉन्डर्सगन या महिलेची आहे. तिचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान असून ही बोट मस्तकहून युरोपकडे जाणार होती.
मात्र 26 जून 2022 रोजी सकाळी 10 च्या सुमारास या बोटीचं इंजिन निकामी झालं. त्यानंतर यावरील खालाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्यानंतर 13 वाजताच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेनं बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानकडे सुपूर्द केले. पण समुद्र खवळलेला असल्यानं लेडी हान या बोटीला टोईंग करता आलं नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळं ही बोट भरकट भारतीय किनाऱ्याला लागली.