उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, “हिंदूंवर अत्याचार करणारा…”

8

मुंबई: राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिला. आपल्या देशाची सातत्याने प्रगती होवो आणि आपली लोकशाही चिरायू होवो, असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश ज्या पद्धतीने पुढे जातोय, त्यावरून देशातील शेवटच्या माणसाचा विचार करणारं हे सरकार देशाला प्रगतीच्या वेगळ्या सोपानावर घेऊन जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी उद्यानाला टिपू सुल्तानचे नाव देण्याच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं. “ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो टिपू सुलतान आमचा देशगौरव होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं नाव महापालिकेने मैदानाला देणं अतिशय अयोग्य आहे. हे एकप्रकारे अत्याचार करणाऱ्याचा महिमा करण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आलाय तो रद्द केला पाहिजे,” असं फडणवीस म्हणाले.

मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाच्या नावावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपामध्ये नवा वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून या मैदानाचा काम करण्यात आलं आहे. या क्रीडा मैदानाचं वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल असं नामकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचा लोकार्पण सोहळा आज  करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत. या क्रीडांगणाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरुन भाजपाने तीव्र विरोध केला आहे.

गोवंडीमधल्या एका उद्यानाला शिवसेनेच्या एम-पूर्व प्रभाग क्रमांक १३६ मधील नगरसेविकेने टिपू सुलतानचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. मात्र, त्यावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यासाठी भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी बाजार व उद्यान समितीकडे एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र ट्वीट करताना मुंबई भाजपाने शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला होता. “हिंदूंचा ज्याने क्रूर पद्धतीने छळ केला, अशा हिंदू द्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव वॉर्ड क्रमांक १३६ च्या उद्यानाला द्यावे, अशी शिवसेनेने मागणी केली आहे. जनाबसेनेच्या या चमत्कारिक मागणीविरोधात नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी बाजार व उद्या समितीला पत्र लिहिले आहे”, असं ट्वीट मुंबई भाजपाकडून करण्यात आलं होतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.